बंद

    जल जीवन मिशन

    केंद्र शासनाने दिनांक 25.12.2019 रोजी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC-Functionl Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे . सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्त‍िक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन , गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

    जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हयातील सर्व वाडया वस्त्यातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्त‍िक नळाव्दारे पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे . याबाबत जल जीवन मिशन मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हयांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत, त्यात अशा वैयक्त‍िक नळ जोडणी साठी सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) व नविन स्वरुपाची नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

    सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग)

    ज्या योजनांचा संकल्पन कालावधी किंवा योजनेचे आयुष्य संपलेले नाही व ज्या योजनांमधुन सद्यस्थितीत पाणी पुरवठा सामुदायिक, सार्वजनिक नळाव्दारे होत आहे, अशा योजनांमधुन दरडोई दररोज 55 लिटर पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते.

    • अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज 55 लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी सक्षम आहेत किंवा, या योजनांमध्ये पंपिंग तास वाढवुन/पंपिंग मशिनरीमध्ये किरकोळ सुधारणा करुन दरडोई दररोज 55 लिटर पाणी देणे शक्य आहे, अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळ जोडणी देणे या कामाचा समावेश सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) कामात करण्यात आला आहे.
    • वरील गावांमध्ये गावातील अंतर्गत वाढीव वितरण वाहिन्या, आवश्यक असल्यास त्या कामाचा समावेश देखील याच सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) मध्ये करण्यात येत आहे.
    • नवीन योजनाज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात नाही अशा गावांसाठी शाश्वत स्त्रोत घेऊन नवीन योजना करण्यात येत आहे.

             राज्य मंत्रीमंडळाच्या दि.08/07/2020 रोजी झालेल्या बैठकीत राज्यात केंद्र शासन प्रणित जल जीवन मिशन राबविण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत वैयक्त‍िक नळ जोडणी व्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन , गुणवत्ता पुर्ण  पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सदर जल जीवन मिशन 50:50 टक्के केंद्र व राज्य हिश्याने राबविण्यात येईल.

    • कृती आराखडा
    • जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्म नळ जोडणी व्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता हि किमान भारतीलय दर्जा-BIS:10500 अशी असावी असे अपेक्षित केले आहे.
    • राज्यातील प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीव्दारे(FHTC-Functionl Household Tap Connection) पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील 4 वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे.
    • जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबा सन 2024 पर्यंत घरगुती नळ जोडणी व्दारे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करुन दयावयाची आहे. यानुसार गाव कृती आराखडा (VAP), जिल्हा कृती आराखडा (DAP)तयार करावा. सदर कृती आराखडयामध्ये दयावयाच्या नियोजित घरगुती नळ जोडण्याचे व त्याकरीता आवश्यक असणा-या निधीचे त्रैमासिक च वार्षिक नियोजन याचा समावेश आहे.
    • जल जीवन मिशन ची अंमलबजावणी

    जल जीवन मिशन मध्ये पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात येतो.

    • ज्या योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRDWP) अंतर्गत सुरु आहेत, अशा योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) किमान 55 LPCD प्रमाणे करुन कार्यात्मक घरगुती जोडणी करणे. तसेच त्या गावांमध्ये स्टँड पोस्ट नळ पाणी पुरवठा योजना आहेत, अशा गावांमध्ये स्टँड पोस्ट पासुन प्रत्येक कुटुंबापर्यंत/घरापर्यंत घरगुती कार्यात्मक घरगुती नळ जोडणी देण्यासाठी पुर्वीच्या योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे.
    • पुर्ण झालेल्या योजनांच्या बाबतीत 40 LPCD ऐवजी किमान 55 LPCD पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने अशा योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) करण्याची कामे सुरु आहेत.
    • ज्या गावांमध्ये पिण्यायोग्य मुबलक भुजल (किंवा अन्य पर्यायाव्दारे ) उपलब्ध आहे, अशा गावामध्ये स्वतंत्र योजना घेण्यात आल्या आहेत.
    • ज्या गावांमध्ये मुबलक भुजल (किंवा अन्य पर्यायाव्दारे ) उपलब्ध आहे, मात्र पाण्याची गुणवत्ता योग्य नाही, अशा गावांमध्ये जल शुध्दीकरण प्रकल्पासह स्वतंत्र योजना घेण्यात आल्या आहेत.
    • ज्या गावांमध्ये पाण्याचे प्रमाणे कमी आहे, अशा गावांसाठी प्रादेशिक/अने गाव योजना (Water Grid) आहेत.
    • आदिवासी भागात नळ पाणी पुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गावे /वाडया/पाडे यांना कायमस्वरुपी पाणी पुरवठा करुन प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणी व्दारे पाणी पुरवठा करणे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी इ, करिता सदर योजनेतुन नळ जोडणी देणे. तसेच एकाकी/ आदिवासी वाडी/पाडयांकरीता सौर उर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविल्या जात आहेत.

    कातकरी वस्ती व टंचाईग्रस्त गाव/पाडयांना प्राधान्य दिले जात आहे.